व्यसनमुक्तीची चार दशकांची दीपस्तंभ वाटचाल:मुक्तांगण प्रेरणादायी प्रवास!
पुणे: एका व्यक्तीचे व्यसन सुटणे म्हणजे केवळ एका जीवाचे पुनरुज्जीवन नव्हे,तर संपूर्ण कुटुंबाचे हरवलेले हास्य,नात्यांमधील दुरावा मिटवून घराच्या उंबरठ्यावर उजळलेला आशीचा दिवा आहे.याच भावनेतून महाराष्ट्राच्या भूमीत सुरू झालेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या लोककल्याणकारी प्रवासाला नुकतीच चार दशके पूर्ण झाली आहेत.
व्यसनाधीन झालेला मनुष्य हा गुन्हेगार किंवा वाईट नसून, त्याला वैद्यकीय उपचार आणि मानसोपचाराची गरज असलेला एक रुग्ण आहे. हा मूलगामी विचार समाजासमोर ठेवून या चळवळीची पायाभरणी झाली. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल.देशपांडे यांच्या आर्थिक पाठबळावर आणि डॉ.अनिल अवचट (बाबा) व डॉ. अनिता अवचट (मॅडम) यांच्या अथक परिश्रमातून पुण्यात मुक्तांची मूर्तमेढ रोवली गेली. निवासी उपचारांची ही संवेदनशील वाटचाल अल्पावधीतच असंख्य उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरली.
चार दशकांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आज एका महाकाय वटवृक्षात रूपांतरित झाले आहे.व्यसनाच्या काळोख्या गर्तेत अडकलेल्या हजारो लोकांना ह्या संस्थेने मायेची सावली देत,नव संजीवनी दिली.या उपचारांमुळे अनेकांचे आयुष्य बदलले.इतकेच नव्हे तर ह्याच केंद्रातून सावरलेल्या अनेकांनी पुढे स्वतः व्यसनमुक्ती केंद्र सुरू केली.परिणामी एकाच केंद्रापूर्ती मर्यादित राहिलेली ही चळवळ एका वटवृक्षाच्या पारंब्यासारखी राज्यभर पसरली. आणि एका व्यक्तीच्या आयुष्यात पेटलेली अशी ज्योत हजारो घरापर्यंत पोहोचली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या “तयाचा वेलू गेला गगनावरी” या उक्तीचा प्रत्यय देत मुक्तांगणने हजारो संसारात पुन्हा आनंदाची पहाट आणली आहे.या चार दशकांच्या निरंतर आणि निस्वार्थ सेवेमुळे अनेक हातांमधील व्यसनांच्या बेड्या निखळून पडल्या आणि त्याच हातांनी पुढे इतरांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या या मानवी सेवेचा हा प्रवास खऱ्या अर्थाने समाजासाठी एक दीपस्तंभ आहे.ह्या देदीप्यमान प्रवासात आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सर्व आजी-माझी कार्यकर्त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन आणि वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

संपादक : पूनम निकम





