पवना धरणग्रस्तांच्या जलसमाधी आंदोलनाची जनजागृती सुरू.
पवनेच्या पाण्याचे कलश पूजन; गावागावात कलश दर्शन २ ऑक्टोबरच्या आंदोलनाची तयारी!
पवनानगर: पवना धरणग्रस्तांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध पुनर्वसन मागण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धरणग्रस्त भागात व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून, पवना धरणाच्या पायथ्याशी पवनेच्या पाण्याचे विधी व कलश पूजन करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा पवित्र कलश आता गावागावांत नेला जात आहे.कलश दर्शनाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधून, २ ऑक्टोबरच्या जलसमाधी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन धरणग्रस्त संघटनेतर्फे करण्यात येत आहे.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची शपथ घेतली आहे.
धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
१) कायदेशीर पुनर्वसन: ९ मे १९७३ च्या आदेशानुसार धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे.
२) रोजगार सवलत: धरणग्रस्तांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ५% नोकऱ्या राखीव ठेवाव्यात.
३) नागरी सुविधा: पुनर्वसन करण्यात आलेल्या गावठाणांमध्ये मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात.
४) ई-निविदा रद्द करणे: आपटी-गेव्हंडे येथील पवना धरणाच्या जमिनीची भाडेतत्त्वावरील निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी.
५) यादीतील त्रुटी दुरुस्ती: जमीन खातेदारांच्या अधिकृत यादीतील त्रुटी दूर करून ती दुरुस्त करण्यात यावी.
या जनजागृती मोहिमेत आणि कार्यक्रमास पवना धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडक, बाळासाहेब मोहोळ, जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, रविकांत रसाळ, मारुती दळवी, राम कालेकर,संजय मोहोळ, दत्तात्रय ठाकर, किसन खैर, लाला गोणते, अमित कुंभार, नारायण कालेकर, सीताबाई डोंगरे, दत्तात्रय घरदाळे, सुनील काळे, सुधीर घरदाळे, अर्जुन भिवडे, नवनाथ राऊत, संतोष राऊत, शांताराम पाठारे, रमेश कालेकर, माऊली गोणते, राजू वरघडे. करुणाताई सरोदे, दिनकर शेटे, तानाजी पडवळ, अशोक जाधव यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते व धरणग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून,आता २ ऑक्टोबरच्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

संपादक : पूनम निकम





