उद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

रक्षाबंधन सणाला कामशेत पोलिसांची मोठी कामगिरी:; गहाळ झालेले १५ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र अवघ्या तीन तासात शोधून केले परत.


कामशेत: सणासुदीच्या दिवसांत नागरिकांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या मालमत्तेची काळजी घेण्यात कामशेत पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता दाखवली आहे.कामशेत बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या एका महिला नागरिकाचे तब्बल १५ लाख रुपयांचे १० तोळे वजनी सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले होते.पोलिसांनी अत्यंत अल्प वेळेत अवघ्या ३ तासात तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करत हे बहुमूल्य मंगळसूत्र शोधून काढून संबंधित महिलेला सुखरूप परत केले आहे.

शुक्रवार दि.२८ ऑगस्ट २०२६ रोजी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास सौ.दिपाली भाऊ नेवाळे (वय ३९,रा. गोवित्री, ता.मावळ,जि.पुणे) या खरेदीसाठी कामशेत बाजारपेठे आल्या होत्या. यादरम्यान त्यांचे १० तोळे वजनाचे सुमारे १५ लाख रुपये बाजार मूल्य असलेले सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कामशेत पोलीस ठाण्यात धाव घेतली व याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आकाश पवार यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तपास पथकातील पोलीस हवालदार अमोल तावरे, कैलास लबडे, महेश थोरात, अमित पाडळे आणि मंगेश मारकड यांच्या पथकाने तातडीने बाजारपेठेच्या दिशेने धाव घेतली.

घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान एका अनोळखी महिलेला ते मंगळसूत्र पडलेले मिळाल्याचे व तिने ते स्वतःकडे घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत आणि कौशल्यपूर्ण तपास करून त्या महिलेचा शोध घेतला व तिच्याशी त्वरित संपर्क साधला.चौकशी दरम्यान  त्या महिलेने तिला बाजारात मंगळसूत्र सापडल्याची कबुली दिली.आणि पोलिसांनी तिच्याकडून संपूर्ण १५ लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेतले.

तक्रारदार सौ.दिपाली नेवाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर अवघ्या ३ तासांच्या आत पोलिसांनी त्यांचे हरवलेले मंगळसूत्र त्यांना पुन्हा मिळवून दिले. रक्षाबंधन या पवित्र सणाच्या दिवशी हरवलेला आपला ऐवज सुखरूप परत मिळाल्यामुळे सौ.दिपाली नेवाळे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी प्रचंड आनंद व्यक्त केला,तसेच कामशेत पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांच्या या तत्पर संवेदनशील आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या या कर्तव्यनिष्ठतेचे कौतुक करत आहेत.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *