उद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडी

ॲड होमिनम (व्यक्तिगत दूषण दोष) हे भांडवलशाही आणि मनुवादी राजकारणाचे वैचारिक शस्त्रास्त्र.


 

पुण्यातील विद्यानंद बापट यांनी गणपती उत्सवातील ध्वनिप्रदूषणविरोधी चर्चेत ‘ॲड होमिनम’ या शब्दाचा वारंवार वापर केल्याने हा शब्द सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या निमित्ताने ‘ॲड होमिनम’ (व्यक्तिगत दूषण दोष) हे भांडवलशाहीचे आणि मनुवादी विचारसरणीचे वैचारिक शस्त्रास्त्र कसे राहिले आहे, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

मानवी इतिहास हा विचारांच्या आणि सिद्धांतांच्या संघर्षाचा इतिहास राहिला आहे. तर्कशास्त्र आणि संवादशास्त्रामध्ये कोणत्याही युक्तिवादाची सत्यता ही केवळ मांडलेल्या तथ्यांवर, आकडेवारीवर आणि वस्तुनिष्ठ पुराव्यांवर तपासली जाते. परंतु, जेव्हा समाजातील प्रस्थापित सत्तासंरचना—विशेषतः भांडवलशाही, सरंजामशाही आणि धर्मांध विचारसरणी—आपल्या वैचारिक मर्यादांमुळे तार्किक प्रश्नांना उत्तरे देण्यास असमर्थ ठरतात, तेव्हा ते या अत्यंत घातक शस्त्राचा वापर करतात.

तर्कशास्त्राच्या भाषेत याला ‘ॲड होमिनम’ म्हणजेच ‘व्यक्तिगत दूषण दोष’ किंवा ‘व्यक्तिगत हल्ला तर्कदोष’ म्हटले जाते. लॅटिन भाषेतील या शब्दाचा सरळ अर्थ ‘व्यक्तीवर थेट हल्ला करणे’ असा होतो. जेव्हा वादविवादात समोरच्या व्यक्तीने मांडलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी तिचे चारित्र्य, जात, वय, लिंग, आहार किंवा वैयक्तिक पार्श्वभूमीवर टीका करून मूळ मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा हा तार्किक दोष घडतो. प्रसिद्ध तर्कशास्त्रज्ञ इर्विंग एम. कोपी (Irving M. Copi) आणि कार्ल कोहेन (Carl Cohen) यांनी त्यांच्या ‘Introduction to Logic’ या ग्रंथात स्पष्ट केल्याप्रमाणे (१९७४ साली प्रथम वर्ष बी.ए. ला आम्हाला ‘लॉजिक’ हा विषय अनिवार्य होता, त्यानिमित्ताने हे पुस्तक वाचले आहे) व्यक्तिगत दूषणदोष मूळ विषयावरून लक्ष विचलित करून श्रोत्यांच्या भावना भडकावण्यासाठी वापरला जातो.आजच्या काळात भांडवलशाही आणि धर्मांधता आपल्या सत्तास्थानाचे रक्षण करण्यासाठी या शस्त्राचा सातत्याने वापर करत आहेत.

भांडवलशाही व्यवस्था ही मूळची मूठभरांचे हितसंबंध जपणारी आणि निसर्ग उद्ध्वस्त करत संपत्तीच्या केंद्रीकरणावर आधारलेली व्यवस्था आहे. कार्ल मार्क्स आणि फ्रीड्रिक एंगेल्स यांनी दाखवून दिले आहे की, ही भांडवली, सरंजामी आणि धार्मिक व्यवस्था स्वतःच्या अस्तित्वासाठी समाजात स्वतःचे वैचारिक वर्चस्व निर्माण करते. परंतु, जेव्हा कामगार, शेतकरी, अभ्यासक किंवा पर्यावरणवादी या व्यवस्थेतील त्रुटींवर—उदा. वाढती बेरोजगारी, महागाई, खाजगीकरण किंवा पर्यावरणाचा ऱ्हास—आकडेवारीसह प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा भांडवलशाहीकडे या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तार्किक उत्तरे नसतात. अशा वेळी सत्ताधारी वर्गाकडून मूळ विषयावरून लक्ष विचलित केले जाते आणि व्यक्तीच्या परिस्थितीवर किंवा स्वार्थावर बोट ठेवून हल्ला केला जातो. एखादा विचारवंत महागडा फोन वापरतो किंवा विशिष्ट संस्थेकडून निधी घेतो, एवढ्याच कारणावरून त्याचे संपूर्ण आर्थिक विश्लेषण खोटे ठरवण्याचा प्रयत्न होतो. त्याचप्रमाणे स्वतःच्या धोरणात्मक अपयशावर प्रश्न विचारल्यास, “भूतकाळात दुसऱ्या पक्षाने काय केले?” असा सवाल उपस्थित करून वर्तमानकाळातील वस्तुनिष्ठ जबाबदारी टाळली जाते. अशा प्रकारे भावना भडकावून मूळ आर्थिक शोषण आणि विषमतेच्या मुद्द्यांवरून लक्ष भटकावले जाते आणि सत्ता सुरक्षित ठेवली जाते.

धार्मिक मूलभूतवाद हा आंधळी श्रद्धा, विषमतावादी परंपरा आणि प्रस्थापित धर्मसत्तेवर टिकून असतो. भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१ अ (एच) मध्ये दिलेला ‘वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी’ हा धर्मांधतेचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. जेव्हा एखादा विवेकवादी किंवा सामाजिक कार्यकर्ता अंधश्रद्धा, कर्मकांड किंवा धार्मिक शोषणावर बुद्धिप्रामाण्यवादी टीका करतो, तेव्हा धर्मांध सत्ता त्याला तर्काने उत्तर देऊ शकत नाही. परिणामी, श्रोत्यांच्या भावना भडकावून प्रश्न विचारणाऱ्याला ‘धर्मद्रोही’, ‘नास्तिक’ किंवा ‘परकीय संस्कृतीचा पाईक’ असे शिक्के मारले जातात आणि त्याची समाजात प्रतिमा मलिन केली जाते. एखादा विचारवंत आपले मत मांडण्याआधीच त्याच्याबद्दल समाजात नकारात्मक पूर्वग्रह पसरवले जातात, जेणेकरून जनतेने त्याचे शास्त्रीय बोलणे ऐकण्याआधीच ते फेटाळून लावावे. गॅलिलिओपासून ते आधुनिक काळातील विवेकवादी विचारवंतांपर्यंतचा इतिहास हाच दर्शवतो की, धर्मांधता नेहमी तर्काचा पराभव करण्यासाठी व्यक्तीच्या अस्तित्वावरच हल्ला करते.

भारताचा विचार करता राजकीय पटावर भांडवलशाही, सरंजामशाही, मनुवादी विचारसरणी आणि धर्मांधता यांची एक अत्यंत सूक्ष्म आणि धोकादायक युती पाहायला मिळते. भांडवलशाहीला जनतेच्या संसाधनांची लूट करण्यासाठी धर्मांधतेच्या भावनिक मुद्द्यांची गरज असते, तर धर्मांधतेला स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी भांडवलशाहीच्या पैशांची आणि माध्यमांची गरज पडते. याचे ताजे उदाहरण म्हणजे आज काही मंदिरे भांडवलदारांकडे सोपवली जाणार असल्याचे वृत्त आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष किंवा सुजाण नागरिक या युतीला शिक्षणाचे खाजगीकरण, निसर्गाची लूट किंवा शेतकरी-कामगारांच्या हक्कांबद्दल थेट प्रश्न विचारतो, तेव्हा या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्याच्या कपड्यांवर, आहाराच्या सवयींवर किंवा व्यक्तिगत हेतूवर शंका उपस्थित केली जाते. यामुळे लोकांच्या भावना प्रक्षोभित होतात, मूळ सामाजिक-आर्थिक प्रश्न बाजूला पडतात आणि संपूर्ण सार्वजनिक संवाद दूषित होतो.

मार्क्सवादी विचारवंत मॉरिस कॉर्नफोर्थ यांच्या मतानुसार, द्वंद्मात्मक पद्धती ही वस्तुनिष्ठ वास्तवाच्या संघर्षातून सत्य शोधून काढते. ‘ॲड होमिनम’ हा तर्कदोष या वैचारिक प्रक्रियेत अडथळा आणतो, कारण तो संघर्षाची दिशा ‘विचार विरुद्ध विचार’ अशी न ठेवता ‘विचार विरुद्ध व्यक्ती’ अशी वळवतो. राजकारणात आणि समाजकारणात स्वतःचे सत्तास्थान वाचवण्यासाठी प्रस्थापित वर्ग ‘ॲड होमिनम’चा वापर एक वैचारिक दिशाभूल करणारे साधन म्हणून करत आहे, ज्यामुळे जनता तार्किक विश्लेषण करणे थांबवते. या वैचारिक कपटजालातून बाहेर पडण्यासाठी समाजात लोकवैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही विधान कोणी केले यापेक्षा त्या विधानातील तथ्य काय आहे, याला प्राधान्य देणे हीच लोकशाही आणि विज्ञाननिष्ठ समाजाची खरी गरज आहे.

पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *