रान भाज्या खाद्य महोत्सवाचे पी. एम.श्री.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे आयोजन!
रानभाजी खाद्य महोत्सव
दिनांक 3 -9- 2026 गुरुवार ला पी. एम.श्री.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे रानभाजी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.आपल्या परिसरातील उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या हा एक मोठा खजिना असतो. रानभाज्या ह्या रानात आपोआप उगवणाऱ्या असतात. त्यावर फवारणी, खत, कीटकनाशक नसतात त्यामुळे ती आरोग्यदायी असतात. अशा रानभाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी,ती खाण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
हडसन, अंबाडी, चवळी, शेवगा ,करलकोसला,फांदी, वावडिंग पत्री,सुरणकंद,अरवी,पुदिना, चिंच, बोर करवंद, शेरण्या ,ओव्याचे पान समुद्रशोक, आंबटचुका, अंबुशी, केना, चमकुरा ,कटुले अशा एकूण 22 प्रकारच्या रानभाज्या विद्यार्थ्यांनी बनवून आणल्या होत्या. ज्वारी, बाजरी, नाचणी, अंबाडी, पातळी वाटी, मिश्र पाच धान्यांची भाकरी, फांदीची भाकरी, शेवग्याच्या पानांचे पराठे अशा विविध भाकरी ही विद्यार्थ्यांनी बनवून आणल्या होत्या. सोबतच करवंदाचे लोणचे ,करवंदाची चटणी ,मुरब्बा, बोराची चटणी ,पुदिना सरबत, करवंद सरबत, चिंचेची आमटी, शेवग्याची सूप असेही प्रकार होते.यावेळी सर्व विद्यार्थी आणि पालक,शिक्षक यांनी रानभाज्यांचाही आस्वाद घेतला.गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम मी सातत्याने राबवते आहे. तणनाशक फवारणीमुळे बऱ्याच रानभाज्या आजकाल उगवत नाही. येणाऱ्या पिढीला रानभाज्यांची माहिती व्हावी आणि त्यांचे महत्त्व समजावे.आरोग्य चांगले राहावे यासाठी हा प्रयत्न आहे.
नीता तोडकर (खाडे)

संपादक : पूनम निकम





