फुलपाखरू महिना: निसर्गाचे रंगोत्सव!
तळेगाव दाभाडे: सप्टेंबर महिना हा निसर्गप्रेमींसाठी एका विशेष उत्सवाचा काळ असतो.कारण हा महिना दरवर्षी फुलपाखरू महिना (Butterfly Month )म्हणून साजरा केला जातो.पावसाळ्याचा निरोप आणि हिरव्यागार ऋतूचे आगमन या संधी काळात महाराष्ट्रसह देशभरात फुलपाखरांचे वैविध्य पाहायला मिळते. मान्सूनच्या उत्तरार्धात वनस्पतींची वाढ जोमाने झालेली असते.ज्यामुळे फुलपाखरांच्या जीवन चक्रासाठी आवश्यक असलेले अंडी, अळ्या आणि सुतीकोशांच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण तयार होते.
हा उपक्रम प्रामुख्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधतेबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी राबवला जातो.सप्टेंबर महिन्यात विविध संस्था,निसर्गप्रेमी आणि वन्यजीव मंडळे फुलपाखरांची गणना,छायाचित्रण स्पर्धा आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित करतात.महाराष्ट्रात या काळात पश्चिम घाटाच्या पट्ट्यात फुलपाखरांच्या शेकडो प्रजाती सक्रिय असतात.कॉमन इमिग्रंट, ब्लू मॉर्मन आणि डेनाइट एग फ्लाई सारखी सुंदर फुलपाखरे आपल्या आसपास सहज नजरेस पडतात.
पर्यावरण संतुलनात फुलपाखरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.ही रंगबिरंगी कीटक केवळ निसर्गाचे सौंदर्य वाढवत नाही, तर ते उत्कृष्ट पराग कणवाहक म्हणूनही काम करतात.वनस्पतींच्या परागीभवनामुळे फळे आणि फुलांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. मात्र झपाट्याने होणारे शहरीकरण, जंगलांची कपात आणि कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे फुलपाखरांच्या अनेक प्रजाती धोक्यात आले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आपल्या घराच्या आसपास किंवा बागेत कडीपत्ता, रुई, सिताफळ आणि फुलझाडे लावणी गरजेचे आहे जी त्यांच्या अळ्यांचे खाद्य असतात. सप्टेंबर महिन्यातील ह्या उपक्रमामुळे लोकांचे निसर्गाशी थेट संबंध येतो. फुलपाखरांच्या या सुंदर दुनियेचे रक्षण करणे म्हणजे आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकवणे होय. आपल्या अंगणात किंवा जवळच्या उद्यानात रमणाऱ्या ह्या पाहुण्यांचे संरक्षण करण्याची शपथ घेण्याची हीच योग्य वेळ आहे. निसर्गाचे नाजूक आणि रंगबिरंगी वैभव टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.आपल्या परिसरात फुलपाखरांची नोंद ठेवून आपणही या मोहिमेत हातभार लावू शकता.

संपादक : पूनम निकम





