संत गाडगे महाराज जयंती अनेक ठिकाणी उत्साहात साजरी !
तळेगाव दाभाडे: महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गाडगे महाराज म्हणजे “साधी राहणे उच्च विचार”याचा अनोखा संगम. त्यांना नेहमी सामाजिक न्याय,सुधारणा आणि स्वच्छता याविषयी अत्यंत रुची होती.दीनदलित यांच्यामधील अन्याय,अंधश्रद्धा, अस्वच्छता हे नष्ट करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. “तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी” ह्या विचारांनी ते दीन,दुबळे,अनाथ व अपंगांची सेवा करत. अंधश्रद्धेला भुलू नका माणसातच देव पहा अशा विचारांनी त्यांनी समाज घटकांना नेहमी प्रेरित केले. आश्रमे,धर्मशाळा,अनाथालय उभारून ते अपंग व अनाथांचे देव बनले.अनिष्ट रूढी,परंपरा,व्यसन,पाखंड, जातीभेद, अस्पृश्यता, कर्जबाजारीपणा,अज्ञान यापासून समाज घटकांना मुक्त करण्यासाठी महाराजांनी अनेक कीर्तने केली. त्यातून समाजहित कसे साधता येईल यासाठी ते नेहमी कार्यरत राहिले. यातून समाजाचा एहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झोकन दिले होते.
अशा आपल्या संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून तळेगाव दाभाडे येथील नामवंत नम्रता आयकॉनिक सोसायटीमध्ये संत गाडगे महाराज यांना अभिवादन म्हणून तेथे स्वच्छता कार्य करत असणाऱ्या महिला भगिनी व पुरुष व सोसायटीतील कचरा संकलन करण्यासाठी येणाऱ्या गाडीवरील पुरुषांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व स्वच्छता दूतांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सौ.उज्वला जावळे यांनी सर्व स्वच्छता दूतांचे औक्षण केले. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे स्वच्छता दूतांच्या हस्ते पूजन करून,त्यांना गुलाब पुष्प व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. व त्यांचे आभार मानण्यात आले. कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दिलेली सेवा सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे.आपलं गाव शहर त्यांच्यामुळेच स्वच्छ आणि सुंदर राहते. ह्या उपक्रमामुळे सर्व स्वच्छता दूतांचा उत्साह वाढला असून त्यांनी सेवाभाव आणि कृतज्ञतेची भावना यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोसायटी सदस्य ज्येष्ठ श्री राधाकृष्ण जावळे, सौ.उज्वला जावळे, गेट सुरक्षारक्षक श्री. विकास सोरते यांचे विशेष परिश्रम लाभले.

संपादक : पूनम निकम





