उद्योगताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

नवनिर्वाचित सल्लागार राजेंद्र काळोखे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; पत्रकारिता व कबड्डी क्षेत्रावर शोककळा


देहू दि.१८ऑगस्ट: तीर्थक्षेत्र देहू नगरातील ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र स्पोर्ट्स कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद (मुंबई) अंतर्गत कार्यरत पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित सल्लागार कै.राजेंद्र दगडूजी काळोखे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. अवघ्या आठवड्याभरापूर्वीच त्यांची सल्लागारपदी निवड झाली होती. संघटनेच्या आगामी कार्यात त्यांचे अनुभव मार्गदर्शन आणि पत्रकारितेतील प्रदीर्घ वाटचालीचा मोठा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र,सल्लागार पदाची नवी जबाबदारी स्वीकारून पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याची संधी मिळण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने पत्रकारिता,क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

देहू नगरीतील पत्रकारिता क्षेत्रात काळोखे यांचे महत्त्वाचे योगदान होते. परिसरातील सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने प्रसिद्धी दिली. सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार म्हणून त्यांनी आपली भूमिका तडफदारपणे बजावली.

पत्रकारितेबरोबरच कबड्डी क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. महाराष्ट्र स्पोर्ट्स कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यातील कबड्डी खेळाच्या विकासासाठी कार्य केले. खेळाडूंना प्रशिक्षण देणे,क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांना पाठबळ देणे आणि कबड्डीच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेणे यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.

काळोखे यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सहकारी, मित्र आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर, मित्र परिवारावर आणि सहकार्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एक अनुभवी पत्रकार,क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ता आणि नव्या जबाबदारीतून पत्रकारांना दिशा देणारा सल्लागार काळाच्या पडद्याआड गेल्याने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद(मुंबई ),क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सर्व पत्रकार बांधव तसेच मित्रपरिवार यांच्याकडून कै.राजेंद्र काळोखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *