तरुणाने पळवली पीएमपी बस
पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाची पीएमपी बस एका तरुणाने पळविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात घडली. बसचालक चावी विसरून गेल्याचा गैरफायदा घेऊन, या तरुणाने बस सुरु करून डेंगळे पुलावरून जंगली महाराज रस्त्यामार्गे थेट नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकापर्यंत बस चालवली. हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांनी बसचा पाठलाग करून या तरुणाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी वीस वर्षीय तरुणाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. हा तरुण मूळचा उत्तराखंडचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळच्या डेंगळे पुलावर वाघोली -महापालिका मार्गावर बस उभी होती. संबंधित बसचालक गाडीला चावी तशीच ठेऊन तो दुसऱ्या फेरीला निघून गेला. त्यावेळी बस पूर्णपणे रिकामी होती. तरुणाने सायंकाळी पाचच्या सुमारास या बसमध्ये शिरून बस सुरु करून वेगाने दामटण्यास सुरुवात केली. तिथून तो झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून जंगली महाराज रस्त्यामार्गे नटराज चौकाच्या दिशेने गेला.
तेथून त्याने बस विरुद्ध दिशेने चालविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकातील कलाकार कट्ट्याजवळ एका पक्षाचे आंदोलन सुरु असल्याचे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात होता. बसची संशयास्पद हालचाल लक्ष्यात येताच पोलिसांनी तातडीने पाठलाग करून, सिग्नलजवळ बस अडकवली आणि तरुणाला ताब्यात घेतले. त्याला डेक्कन पोलिस ठाण्यात नेले.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातून २५ जानेवारी २०१२रोजी संतोष माने याने एसटी बस पळवून नेली होती. त्याने पादचारी आणि वाहनचालकांना ठोकरले होते. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारीच्या घटनेने या प्रकरणाच्या वेदनादायी आठवणी ताज्या झाल्या.

संपादक : पूनम निकम





