श्री पोटोबा महाराज मंदिरात दोन आकर्षक दिपमाळांचे लोकार्पण.
वडगांव मावळ : येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या दोन आकर्षक दीपमाळांचे लोकार्पण दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर मोठया भक्तीभावात पार पडले. भाविक संभाजीराव पानसरे व त्यांच्या परिवाराने मंदिराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी स्वखर्चातून दीपमाळा उभारण्याचा उपक्रम हाती घेतला असून, या दोन्ही दीपमाळा आणि तुळशीवृंदावन यांचे उदघाटन धार्मिक वातावरणात संपन्न झाले.
श्री दत्तजयंतीचा सोहळा असल्याने मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता. सकाळी धार्मिक विधी, दीपप्रज्वलन व मंत्रोच्चारणाच्या वातावरणात पानसरे यांच्या हस्ते दीपमाळांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात दिव्यांचा लखलखाट उजळून निघाला होता. नव्याने उभारण्यात आलेल्या दीपमाळांमुळे मंदिराचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व अधिक अधोरेखित झाल्याचे भाविकांनी सांगितले.
या प्रसंगी चंद्रकांत ढोरे, गोरख ढोरे तसेच पानसरे परिवारातील सदस्य उपस्थित होते. भाविकांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल देवस्थान समितीच्या वतीने पानसरे कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. देवस्थान पदाधिकारी किरण भिलारे, गणेश ढोरे, अनंता कुडे, भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, तुकाराम ढोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पानसरे कुटुंबियांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दिपमाळेच्या प्रकाशाने उजळलेला मंदिर परिसर, दत्तजयंतीचा सण आणि भाविकांची मोठी उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला उत्सवी रंग चढला. स्थानिक गावाकऱ्यांनीही पानसरे परिवाराचे आभार मानत हा उपक्रम भाविकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
श्री पोटोबा महाराज देवस्थानात पुढील काळात विविध सुविधा उभारण्याचे नियोजन असून भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा विकास होतं राहणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.

संपादक : पूनम निकम





