नेपाळमध्ये जलतांडव! महापुरात शेकडो जणांचा मृत्यू..
काठमांडू,दि.२६: तिबेटच्या सीमेलगत असलेल्या नेपाळमधील रसुवा जिल्ह्यासह सीमा भागात बुधवारी भोटेकोसी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. व शेकडो मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्य घटना,कारण आणि पायाभूत सुविधांचे नुकसान:
तिबेट-नेपाळ सीमेजवळ हिमनदी/खडक ढासळल्याने (Rock-ice avalanche) नदीचा प्रवाह अडवला गेला आणि पाण्याचा प्रचंड मोठा प्रपात खाली आल्याने हा आपत्कालीन पूर निर्माण झाला.रसुवा जिल्ह्यातील तिमुरे बाजार, स्याफ्रुबेसी आणि नुवाकोट परिसर या पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या त्रिशूली नदीच्या काठावरील अनेक गावे,जलविद्युत प्रकल्प, रस्ते,पूल उद्ध्वस्त झाले. तसेच नेपाळ टेलीकॉमचे टॉवर्स आणि फायबर लाइन्स क्षतिग्रस्त झाल्यामुळे अनेक भागात संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. भोटेकोशी नदीवरील सुमारे ११ जलविद्युत केंद्रांना मोठा फटका बसला आहे.पूर्व नेपाळमध्ये सकाळी ८.३० वाजता भूकंप झाला,या भूकंपाचा आणि महाप्रलयाचा थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र, नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर कनाल यांनी भूकंपानंतर तीन मिनिटांनी हेमकार्डा कोसळल्याचे नेपाळी संसदेत म्हटले आहे.
जीवित आणि वित्तहानी:
पुराच्या भीषण प्रवाहात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून,शेकडो नागरिक व पर्यटक बेपत्ता आहेत. नेपाळ पोलिस आणि सशस्त्र पोलीस दलाचे सुमारे ४१ जवान प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता आहेत. तसेच बेपत्ता पर्यटकांमध्ये १०० हून अधिक भारतीय नागरिक आणि कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या भाविकांचा समावेश आहे.
बचाव कार्य व मदत उपाययोजना:
नेपाळ लष्कर,पोलिस आणि सशस्त्र पोलीस दलाद्वारे हेलिकॉप्टर्स,ड्रोन आणि श्वानपथकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे.त्रिशूली नदी पुढे भारतात प्रवेश करताना गंडक नदीला मिळते,त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संपादक : पूनम निकम





