उद्योगक्राईमटेक्नॉलॉजीताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहत्त्वाचेमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

“आई राजा उदो उदो”जयघोषाने तुळजापूर परिसर दुमदुमून गेला!


तुळजापूर दि.२५: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव आणि विजयादशमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर,मातेच्या मंचकी निद्रेची सांगता होऊन,कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवीची मूळ मूर्ती पुन्हा निद्रा स्थानावरून मुख्य सिंहासनारुढ करण्यात आली आहे. या धार्मिक विधीनंतर संपूर्ण तुळजापूर क्षेत्रात “आई राजा उदो उदो” जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

शारदीय नवरात्र उत्सवामध्ये महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केल्यानंतर, विजयादशमीला मातेची मूर्ती मंचकी निद्रेसाठी म्हणजेच विश्रांतीसाठी ठेवली जाते. विजयादशमीपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचे हे दिवस देवीच्या मंचकी निद्रेचा काळ मानला जातो.

कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटे धार्मिक शास्त्रोक्त परंपरेनुसार, तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची पूजा-अर्चा,अभिषेक आणि सर्व धार्मिक विधी करून मूर्ती अत्यंत भक्ती भावाने मुख्य सुवर्ण सिंहासनावर विराजमान करण्यात आली.सिंहासन स्थापनेनंतर मातेची महापूजा आणि महाआरती करण्यात आली.

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूर मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना येथून लाखो भाविक दाखल झालेले आहेत. विशेषतः सोलापूर आणि इतर भागातून शेकडो किलोमीटर ची पायी वारी करत आलेले भाविक तुळजापुरात मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

या विशेष पर्वानिमित्त तुळजाभवानी मंदिर आणि मुख्य गाभारा आकर्षक फुलांची सजावट व रंगबिरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता,मंदिर संस्थान आणि प्रशासनाच्यावतीने दर्शन रांगेचे नियोजन,वैद्यकीय पथके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

सिंहासन स्थापनेनंतर तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, संपूर्ण शहरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.

 

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *