येलवाडी येथील “वात्सल्य” मतिमंद पुनर्वसन केंद्रात सामाजिक उपक्रम :निवासी विद्यार्थ्यांना दुपारच्या नाश्त्याचे वाटप!
“वात्सल्य विशेष पुनर्वसन केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन”अमरावतीच्या एमएसडब्ल्यू विद्यार्थिनींचे कौतुकास्पद कार्य:
देहू (येलवाडी) दि.१५: पुणे जिल्ह्यातील देहू परिसरातील येलवाडी येथील “वात्सल्य विशेष मुला-मुलींचे पुनर्वसन केंद्र” येथे नुकताच एक सदिच्छा भेट व सेवाभावी कार्यक्रम पार पडला.या संस्थेच्या माध्यमातून बौद्धिकदष्ट्या अक्षम (विशेष गरजू) मुला-मुलींच्या संगोपनाचे आणि पुनर्वसनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू असून,सध्या या संस्थेत ५८ मुलं-मुली निवासी वास्तव्य करत आहेत.
या संस्थेची संपूर्ण धुरा सौ.वृषाली देवतरासे मॅडम उत्तमरीत्या सांभाळत असून,त्यांना श्री.विलास देवतरासे यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.संस्थेच्या या उत्कट कार्याची दखल घेत, सौ.संजीवनी काटदरे,सौ.पल्लवी शिंदे, पूनम बागुल आणि श्री.किरण रोकडे यांनी या केंद्राला सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी तेथील निवासी मुलांना दुपारी अल्पोपहाराचे वाटप केले,आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधत आनंद व्यक्त केला.
या भेटीचे एक विशेष आकर्षण म्हणजे अमरावती वरून एमएसडब्ल्यू (MSW) ही पदवी घेतलेल्या पाच तरुण मुली सध्या या संस्थेत अप्रेंटिसशीप (प्रशिक्षण) घेण्यासाठी आल्या आहेत. ह्या विद्यार्थिनी येथील विशेष मुला-मुलींच्या सानिध्यात मन लावून आणि अत्यंत प्रेमळ पद्धतीने आपले काम चोखपणे पार पाडत आहेत.त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“वात्सल्य”सारख्या संस्था आणि समाजसेवकांच्या या सहभागामुळे विशेष गरजू मुलांना एक हक्काचा आधार आणि प्रेमाचे वातावरण मिळत असल्याचे ह्या भेटीतून प्रकर्षाने जाणवते.संस्थेच्या वतीने सौ. वृषाली देवतरासे व श्री.विलास देवतरासे यांनी सौ.संजीवनी काटदरे, सौ.पल्लवी शिंदे,पूनम बागुल व किरण रोकडे यांचे विशेष आभार मानले.

संपादक : पूनम निकम





