मावळात उत्साहात साजरे झाले रक्षाबंधन!
तळेगाव दाभाडे दि.२९: भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा आणि अतूट विश्वासाचा सण असलेल्या रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा मावळ तालुक्यात अत्यंत उत्साहात आणि पारंपारिक वातावरणात साजरी झाली. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या सणासाठी सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
तळेगाव दाभाडे, लोणावळा, वडगाव मावळ आणि चाकण परिसरातील बाजारपेठा राखी पौर्णिमेच्या पूर्व संध्येपासूनच ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या.पारंपारिक रेशमी धाग्यांपासून ते आकर्षक आणि डिझायनर राख्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वर्गात पसंती मिळाली. तसेच लहान मुलांसाठी कार्टून करेक्टर्सच्या राख्या आणि स्वस्तिक, चंदनांच्या राख्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली.मिठाईच्या दुकानांमध्ये लाडू पेढे आणि विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सणाच्या दिवशी लांब अंतरावर राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी आणि माहेरी येण्यासाठी महिला वर्गाची मोठी लगबग दिसून आली.रेल्वे स्थानके, बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.प्रशासनाकडून या दिवशी प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.
मावळ भागातील विविध शाळांमध्ये ही रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधून मैत्री आणि स्नेहाचा संदेश दिला. तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने अनाथ आश्रमात आणि वृद्धाश्रमात जाऊन हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ज्यामुळे या पवित्र सणाला एक सामाजिक आणि मानवी स्पर्श मिळाला.

संपादक : पूनम निकम





