मावळच्या पत्रकारांना विमा संरक्षणाचे कवच!
मावळ तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम: तालुक्यातील पत्रकारांना मिळाले विमा संरक्षणाचे कवच!
वडगाव मावळ दि.२५: समाजातील अन्याय,अत्याचार आणि जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेला आता संघटनेचा मजबूत आधार मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न ‘मावळ तालुका पत्रकार संघाच्या’ वतीने आणि सन्माननीय आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांना विमा संरक्षणाचे कवच प्रदान करण्यात आले आहे. तळेगाव नगरीचे उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते या विमा पॉलिसींचे वितरण करण्यात आले.
उपक्रमाची भूमिका व उद्देश:
नियमित पत्रकारिता करत असताना पत्रकारांना अनेकदा जीव धोक्यात घालून घटनास्थळी धाव घ्यावी लागते.अपघात, नैसर्गिक आपत्ती, गुन्हेगारी घटनांचे वार्तांकन तसेच विविध संवेदनशील सामाजिक प्रश्नांवर काम करताना पत्रकारांना मोठ्या जोखमींचा सामना करावा लागतो. अशा बिकट परिस्थितीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना हक्काची आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी,ह्या प्रमुख उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळ तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक व सल्लागार स्व.राजेंद्र काळोखे यांना उपस्थित मान्यवर आणि पत्रकारांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.गेल्याच आठवड्यात त्यांच्या झालेल्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे.त्यांच्या हयातीत त्यांनी केलेल्या पत्रकारिता व सामाजिक कार्याची अमूल्य आठवण सदैव लोकांच्या स्मरणात राहील अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
“पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधार स्तंभ आहे. समाजातील सामान्य माणसाचा आवाज प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात.त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणारा प्रत्येक उपक्रम हा महत्त्वाचा आहे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, भविष्यातही पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल” असे आश्वासन सुधाकर शेळके यांनी यावेळी सर्व पत्रकारांना दिले.
“पत्रकार दिवस-रात्र कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य बजावतो,मात्र त्याच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी दुर्लक्षित राहतो. या विमा संरक्षणामुळे पत्रकारांच्या कुटुंबीयांना मोठा आधार लाभणार आहे” असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा यांनी यावेळी व्यक्त केले.
पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करत ॲड.संजय पाटील म्हणाले की, संघटनेची खरी ताकद ही केवळ पदांमध्ये नसून,सदस्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात असते.विमा संरक्षण हा उपक्रम पत्रकारांच्या हितासाठी महत्त्वाचा टप्पा आहे.भविष्यातही पत्रकारांच्या कल्याणासाठी असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज आहे.
“पत्रकार समाजासाठी लढतो,मात्र त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचाही विचार होणे गरजेचे आहे. पत्रकारांना विमा संरक्षण मिळणे ही सुरुवात असून, भविष्यात तालुक्यातील प्रत्येक पात्र पत्रकाराला अशा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने प्रयत्न करावेत” असे मनोगत अमिन खान यांनी व्यक्त केले.
संघटित लढा आणि कल्याणचा निर्धार:
मावळ तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन ठाकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की,तालुक्यातील पत्रकारांच्या प्रत्येक अडीअडचणीच्यावेळी संघटना सातत्याने कटिबद्ध राहून काम करत राहील.पत्रकारांच्या सुरक्षेपासून त्यांच्या न्याय हक्कांपर्यंत प्रत्येक विषयावर संघटितपणे आवाज उठवला जाईल. विमा संरक्षण योजना हा त्याच व्यापक दिशेने टाकलेला एक महत्त्वाचा टप्पा आहे.
कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष सचिन ठाकर,ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, अमिन खान, ॲड.संजय पाटील, कार्याध्यक्षा रेखा भेगडे, सचिव प्रा.महादेव वाघमारे, उपाध्यक्ष प्रा.योगेश घोडके, मनोज गवळी, खजिदार संतोष थिटे,प्रकल्प प्रमुख गणेश वायकर, दत्तात्रय म्हाळसकर, सुभाष भांडे,सचिन मोरे, गणेश भेगडे आणि तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश घोडके यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सचिन ठाकर यांनी मानले.
“पत्रकारांच्या कल्याणासाठी एकजूट सुरक्षिततेसाठी विमा कवच आणि हक्कांसाठी संघटित लढा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.”

संपादक : पूनम निकम





