उद्योगताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

मावळात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची मोठी गंगा!तरुण पिढीला योग्य दिशा देण्याची गरज :बाळा भेगडे


तळेगाव दाभाडे, दि.१९: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मावळ तालुका येथील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज येथे करण्यात आले होते. नवनिर्वाचित कार्यकारणीच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ग्रामीण पत्रकारिताला अधिक बळ व नवी दिशा मिळावी म्हणून मा.राज्यमंत्री आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत भेगडे म्हणाले की, स्वातंत्र्य पूर्व काळातील लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली ही मावळ तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे.या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे भेगडे यांनी यावेळी सांगितले. संस्थेच्या मावळ तालुक्यात ६ माध्यमिक, २ प्राथमिक शाळा, सीबीएससी इंग्लिश मीडियम शाळा, ७ जुनियर कॉलेज, लॉ कॉलेज आणि इंजीनियरिंग कॉलेज कार्यरत आहेत. इंजीनियरिंग कॉलेजच्या माध्यमातून सुमारे १२० कंपन्यांमध्ये ३००० विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. संस्थेमध्ये सुमारे १७ हजार चौरस मीटरचे भव्य ग्रंथालय असून,समर्थ विद्यालयाच्या नवीन वास्तूचे काम सुरू आहे.तसेच माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार असून, भविष्यात प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन (पेपरलेस) केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आणि आजच्या तरुणाईच्या संस्कारांवर बोलताना भेगडे म्हणाले की,आजची तरुणाई उशिरा रात्री घराबाहेर पडत असून यावर पालकांनी आणि तरुणांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पाल्यावर चांगल्या संस्कारांसोबतच पालकांनी त्यांच्याशी सतत सुसंवाद साधला पाहिजे जेणेकरून त्यांच्या गरजा व अपेक्षा समजून योग्य मार्गदर्शन करता येईल. मावळ तालुक्यातील तरुण पिढीला अमली पदार्थ व ड्रग्सच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी,नागरिक आणि पत्रकारांनी एकत्र येऊन मोठी जनजागृती मोहीम राबवणे गरजेचे आहे, असे वक्तव्य बाळा भेगडे यांनी यावेळी केले.

पुढे कार्यक्रमात तालुक्यातील विविध पत्रकार संघातील नव्याने निवड झालेल्या पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार सन्माननीय बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक सोनबा गोपाळे गुरुजी आणि उद्योजक राहुल काकडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम यांनी केले.तर आभार इंदोरी तळेगाव मंडळाचे अध्यक्ष विनायक भेगडे यांनी मानले.


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *