तळेगावात महिला भजनी मंडळ मेळावा उत्साहात संपन्न!
तळेगाव दाभाडे :येथील श्रीरंग कलानिकेतनमध्ये कै. पं. शरद जोशी कै. शीला शरद जोशी यांच्या स्मरणार्थ महिला भजणी मंडळ मेळावा आयोजित करण्यात आला होता. तळेगावातील संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांसाठी आयोजीत ह्या कार्यक्रमात एकूण १४ महिला भजनी मंडळानी सहभाग घेतला होता. रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या वनश्रीनगर येथील सभागृहात दुपारी ४ ते सायंकाळी ७ दरम्यान सर्व भजनी मंडळानी भजणे सादर केले.
कार्यक्रमामध्ये जिव्हाळा, संगीत शारदा, राधाकृष्ण, शारदेय स्वरगंधा, स्वरा, आसावरी, संवादिनी, रुक्मिणी, स्वराली, मधुवंती, वरदायिनी, राई रखुमाबाई, डोळसनाथ महिला भजनी मंडळ असे एकूण १४४ महिला कलाकार सहभागी झाले होते. साथसंगत करण्यासाठी तबला, पखवाज व संवादिनी वादक देखील उपस्थित होते.
तळेगावातील संगीत अभ्यासक पं. किरण परळीकर यांनी सर्व सहभागी मंडळांचे कौतुक केले तसेच सर्वांनी संगीत ऐकावे व आपल्या सादरीकरणासाठी दिलेला वेळ पाळावा अशी सूचना आपल्या मनोगतातून केली. यावेळी व्यासपीठावर श्रीरंग कलानिकेतनचे अध्यक्ष राजीव कुमठेकर, विश्वस्त बागेश्री लोणकर व विश्वास देशपांडे उपस्थित होते.
मेळाव्यासाठी समीर सहस्रबुद्धे, सचिन कहडणे यांनी कै. चंदन कारके मित्रमंडळाच्या माध्यमातून व मा. उपाध्यक्ष सुहास धस यांनी त्यांच्या पत्नी कै. सौ. विठाबाई कुंडलिक धस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्थ सहाय्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश ठसे, विनय कशेळकर, दिपक आपटे, किरण पळसुले देसाई, राजेंद्र गुर्जर, दीपक कुलकर्णी, प्रकाश जोशी, चैतन्य कुरूंदवाड, सुहास धस, समीर सहस्रबुद्धे, लक्ष्मीकांत धोंगडे,अनिकेत जोशी, सीमा आवटे व सुनील सोनार यांचे विशेष परिश्रम लाभले.
कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन ‘रसिक साऊंड’ चे केदार अभ्यंकर यांचे होते. अभंग गायक कुंडलिक धस व प्रसिद्ध गायिका संपदा थिटे यांच्या सुमधुर गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादक : पूनम निकम





