23जानेवारी पासून श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे होणाऱ्या भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन व कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू
भंडारा डोंगर देहू: वारकरी परंपरेच्या अनुयांयासाठी श्रद्धा, चिंतन, व उपासनेचे तीर्थस्थान म्हणजे भंडारा डोंगर, येथे माघ शुद्ध दशमीच्या पावन पर्वानिमित्त भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कार्यक्रमस्थळी मंडप उभारणीच्या कामाला दि. ५ जानेवारी पासून विधिवत प्रारंभ झाला आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर जन्मोत्सव संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई षष्टशतकोत्तर अमृत महोत्सव तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष या ऐतिहासिक तसेच अध्यात्मिक परवाचे औचित्य साधून हा महान शुद्ध दशमी सोहळा यंदा भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा सोहळा शुक्रवार दि.२३ जानेवारी ते शनिवार दि.३१ जानेवारी ह्या कालावधीत श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्यावरील शंभर एकर क्षेत्रावर भव्य पटांगणात संपन्न होणार आहे.
वारकरी शिक्षण संस्थेचे अर्धव्यू परमपूज्य ह.भ.प मारुती बाबा कुरेकर महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच वारकरीरत्न ह.भ.प छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या आयोजनात सकल पुणे जिल्हा वारकरी संप्रदाय, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व माघ शुद्ध दशमी सोहळा समिती सहभागी होणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा खालील प्रमाणे:
पहाटे काकडा आरती व अभिषेक
ज्ञानेश्वरी व गाथा पारायण
दुपारी व रात्री किर्तन महोत्सव
संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा
भारुड संगीत भजन व जागर
असे विविध सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे. लाखो भाविकांसाठी दररोज दिवसभर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती श्री क्षेत्र भंडारा डोंगरचे अध्यक्ष साहेबराव उर्फ बाळासाहेब काशीद यांनी दिली.
मंडप उभारणीचे स्वरूप खालील प्रमाणे:
मुख्य मंडप: ४००×२०० फूट
गाथा व ज्ञानेश्वरी पारायणासाठी: १००× ३०० फूट आकाराचे दोन मंडप तेही स्वतंत्र्य
महाप्रसाद मंडप: १००× ३०० फूट
स्वयंपाकगृह: ६०×३०० फूट
असे मंडप उभारणीचे स्वरूप आहे.
मंडप उभारणी शुभारंभ सोहळ्याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प पुरुषोत्तम महाराज मोरे, माझी विश्वस्त ह.भ.प माणिक महाराज मोरे, ह.भ.प शंकर महाराज मराठे ह.भ.प रवींद्र महाराज ढोरे तसेच नेवाळे मंडप चे मालक महादू नेवाळे यांच्या शुभहस्ते एका खांबाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त माघ शुद्ध दशमी सोहळा समितीचे पदाधिकारी व वारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
भंडारा डोंगराच्या पायथ्याशी हा वारकरी संप्रदायाचा वैभवी सोहळा होणार असून दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच वाजता श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथा इथपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये ३७५ ध्वजधारी, कलशधारी तुलसीदारी कीर्तनकार टाळकरी मृदंग सेवक ब्रम्हविनाधारी चोपदार सहभागी होणार आहे तर तुकाराम नावांच्या ३७५ व्यक्ती ,ज्ञानेश्वर नावांच्या ७५० व्यक्ती, नामदेव नावाच्या ६७५ व्यक्ती आणि जनाबाई नावाच्या ६७५ महिला सहभागी होणार आहेत.
गाथा पारायण यामध्ये ५००० गाथावाचक, १००० टाळकरी प्रतिदिन २५ मृदुंगवादक, २४ तास ज्ञानदेव व श्री तुकाराम भजन प्रहर होणार आहे. एक लक्ष भाविकांना मुळशी तालुक्यातर्फे पुरणपोळीचे भोजन देण्यात येणार आहे. प्रतिदिन दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र कथा वाचन ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज करतील. बुधवार 28 जानेवारी दुपारी एक वाजता डॉक्टर रामचंद्र देखणे कला प्रबोधनी तर्फे डॉक्टर भावार्थ देखणे आणि अवधूत गांधी यांचे बहुरूपी भारुड कार्यक्रम होणार आहेत.
देशात आणि जगात पर्यावरण आणि प्रदूषण यांचे संतुलन बिघडल्याने मानव जातीवर याचा मोठा परिणाम होत आहे. १००० वर्षांपूर्वी आपल्या साधुसंतांनी पर्यावरणावर अभंगाद्वारे जनजागृती केलेली आहे. त्यामुळे देहू भंडारा डोंगर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पर्यावरण सप्ताह देखील पाळला जाणार आहे.कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला बोध करावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

संपादक : पूनम निकम





