अखेर स्वप्न पूर्ण झाले..
टाटा अल्ट्रा मॅरेथॉन ची ९ आवृत्ती २२फेब्रुवारी २०२६ रविवार रोजी लोणावळा येथे पार पडली. ज्यामध्ये ५० कि.मी अल्ट्रा रन आणि ३५ कि.मी टाटा चॅलेंज रन या श्रेणी समाविष्ट होत्या. ही स्पर्धा दावडी बोहरा सेनेटोरियम लोणावळा येथून सुरू झाली.
माझ्या जीवनातील आजचा खूप महत्त्वाचा होता. तसे पाहिले तर खूप दिवसापासून मी या दिवसाची वाट पाहत होतो.कारण हा दिवस माझ्या जीवनातील पहिल्या अल्ट्रा मॅरेथॉनचा होता.यासाठी मी कित्येक दिवसांपासून सराव करत होतो. पण मनामध्ये प्रचंड भीती होती. कारण चढ-उताराची ही स्पर्धा तुमच्या शरीराची दमछाक मोठ्या प्रमाणावर करते. एलिवेशन खूप असल्यामुळे माझे मन भीतीने व काळजीने डगमगत होते.मला ४२ कि.मी मॅरेथॉनची विशेष भीती वाटत नाही, परंतु ही ५० कि.मी च्या अल्ट्रा मॅरेथॉनने मनाला घाबरून सोडले होते. पण माझा निर्धार पक्का होता. हि स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मला ५ तास ३३ मिनिटे लागले. व माझे खूप मोठे स्वप्न आज पूर्ण झाले. माझ्या यशस्वीतेमागे माझे दोन्ही सर विजय बसवे व मन्नू सिंग यांचे मला सातत्याने मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा मित्र ज्याचा मला सार्थ अभिमान वाटतो,तो म्हणजे किरण भाऊ शेळके जो सध्या “बलिदान मास” पूर्ण करत आहे. आणि सतत ४० दिवस २४ किलोमीटर हे अंतर तो धावत आहे. त्याने मला फोनवर धीर देत सांगितले की, भावा अशक्य असं काहीच नसतं,तू हे नक्कीच करू शकतोस! त्याने मला खूप मोटिवेशन दिल,त्याच्या या शब्दांनी माझे मन खंबीर झाले आणि माझ्यातला आत्मविश्वास जागा झाला.
माझ्या या कामगिरीत मला आणखी एका व्यक्तीचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले ते म्हणजे सुरेश भाऊ जाट यांचे. ते मला नेहमी म्हणायचे भाऊ तुम्ही अल्ट्रा मॅरेथॉन नक्की पूर्ण करणार. त्यांनी मला सरावात खूप मार्गदर्शन केले. यादरम्यान त्यांनी मला एलिवेशनचा सराव व त्यासाठी लागणारा व्यायाम याविषयीचे योग्य असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल सुरेश भाऊ मी आज तुमचे खरंच धन्यवाद मानतो.
माझ्या कुटुंबाचे, माझ्या जिवाभावाच्या मित्रांचे, सर्वांचं सहकार्य व आशीर्वाद मला लाभले. आणि ही स्पर्धा मी पूर्ण करू शकलो. खरंच ही स्पर्धा खूप अवघड आहे पण मी असे म्हणेन की या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावं, कारण कठीण परिस्थितीतून यशाचा मार्ग हा नक्कीच मिळतो,या स्पर्धेतून मी हे शिकलोय. “स्वप्न ही नुसती पाहायची नसतात तर प्रयत्न केला की ती पूर्णही होतात” याची अनुभूती मला या स्पर्धेद्वारा मिळाली.
टाटा अल्ट्रा मॅरेथॉन लोणावळा यांच्या सर्व टीम व सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन या सर्वांनी मिळून खूप छान असे कार्यक्रमाचे नियोजन केलेले होते. सर्वांचे मनापासून धन्यवाद!
हनुमंत जांभुळकर..

संपादक : पूनम निकम





