धर्मवीर बलिदान मास
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ सर्वत्र धर्मवीर बलिदान मास हा निष्ठेने पाळला जातो.खरंच सार्थ अभिमान वाटतो आजच्या या युवा पिढीचा त्यांना आपल्या महाराजांच्या पराक्रमाची, त्यांनी दिलेल्या बलिदानाची जाण आहे.आज आपण स्वतंत्र स्वराज्यामध्ये ताठ मानेने वावरत आहोत ते फक्त आणि फक्त “छत्रपती शिवाजी महाराज”आणि “छत्रपती संभाजी महाराज” यांच्यामुळेच..
तळेगाव शहरातील अनेक युवकांनी महाराजांना आदरांजली म्हणून हा धर्मवीर बलिदान मास अगदी मनापासून आणि संयमाने पाळला आहे. या बलिदान मासा दरम्यान तळेगाव मधील असंख्य युवक दररोज शिवशंभुतीर्थ येथे एकत्र येऊन ध्येय मंत्र,प्रेरणा मंत्र आणि निवडक श्लोकांचे सामूहिक वाचन करतात. यामुळे धर्म रक्षणासाठी प्राण आहुती देणाऱ्या आपल्या धर्मवीरांना अभिवादन देण्यात येते. व हिंदवी स्वराज्य रक्षण हा संकल्प करण्यात येतो.या बलिदान मास उपक्रमातून छत्रपतींची फक्त आठवण नाही, तर त्यांच्या विचारांची शक्ती स्वतःमध्ये रुजावी व आपणही छत्रपतींसारखे पराक्रमी व समाजहितासाठी उपयुक्त व्हावे, व हाती घेतलेल्या कार्यापूर्तीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी युवक एकमताने देतात.
महाराजांनी धर्मासाठी मृत्यूचा हात पकडला,पण अधर्माशी हात मिळवणी केली नाही.त्यांच्या या त्यागामुळे हिंदवी स्वराज्य, व साम्राज्याची ज्योत अखंड प्रज्वलित आहे आणि ह्या गोष्टीचा आपल्या सर्व मराठ्यांना गर्व आहे. महाराजांच्या विचारांचा, शौर्याचा, त्यागाचा, धाडसाचा,सहनशीलतेचा,निष्ठेचा मार्ग अबाधित ठेवण्यासाठी तळेगावातील अनेक युवक या बलिदान मासामध्ये सहभागी झाले आहेत. या सर्व तरुण पिढीचे कौतुक वाटत आहे. आजच्या या तांत्रिक युगात महाराजांच्या स्मरणार्थ अनेक युवकांनी ह्या धर्मवीर मासाचा अवलंब करून महाराजांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली आहे.कोणाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या छत्रपतींना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली बहाल करण्यासाठी या सर्व युवकांनी “धर्मवीर बलिदान मास” पाळला आहे.
“धर्मवीर बलिदान मास” म्हणजे काय आणि तो का पाळायचा ? व कसा पाळायचा? तर औरंगजेबाने शंभूराजांना पकडल्या गेलेल्या क्षणापासून दररोज त्यांचा एक एक अवयव तोडत चाळीस दिवस त्यांना वेदना देऊन शेवटी त्यांची अत्यंत निष्ठुर हत्या केली. शंभूराजांनी स्वराज्यासाठी आपले प्राण गमावले. म्हणून हा संपूर्ण महिना आपण कुठल्याही एका सुखाचा त्याग करत असतो. व तो सुतकाचा महिना म्हणून पाळायचा असतो. यादरम्यान प्रत्येक शंभूप्रेमी ने दिवसाकाठी एकदा जेवावे,गोड अन्न, बाहेरचे चमचमीत पदार्थ न खाणे,जमिनीवर झोपणे ,चहा- कॉफी टाळणे, टीव्ही न पाहणे,पायात चप्पल न परिधान करणे, किंवा आपली एखादी आवडती गोष्ट सोडणे या पद्धतीने आपण धर्मवीर बलिदान मास पाळायचा असतो.आपल्यासाठी हा महिना शौकाचा, दुःखाचा व सुतकाचा असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आनंदाचे ,उत्सवाचे शक्यतो आयोजन करू नये आणि असल्यास तेथे सहभागीही होऊ नये अशा पद्धतीने हा मास आपण पाळायचा असतो.
धर्मवीर बलिदान मासामुळे संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण यामुळे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जोपासली जाते. त्यांच्या बलिदानाची प्रेरणा दुसऱ्या पिढीला देता येते. स्वराज्य स्वाभिमान आणि धर्मरक्षणाची भावना दृढ करण्यास मदत होते.त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम घेतले जातात. ज्यामध्ये संभाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले जाते व पुष्पांजली वाहिली जाते. शौर्य गाथांचे वाचन होते. व्याख्याने ,कीर्तने घेतली जातात.दुर्ग भ्रमंती, मशाल मोर्चे काढले जातात. रक्तदान शिबिरे, समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात, आणि ११ मार्च रोजी विशेष स्मरण दिन कार्यक्रम ठेवले जातात.
छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे पराक्रम, विद्वत्ता आणि अढळ निष्ठेचे प्रतीक आहे.”बलिदान मास” त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आदर्शांचे स्मरण ठेवण्याचा काळ आहे. त्यांचे बलिदान स्वराज्य इतिहासातील अतुलनीय घटना मानली जाते.आपल्या छत्रपतींसाठी युवकांनी धर्मवीर मास हा संयमाने व निष्ठेने पाळणे अत्यंत गर्वाच व स्वाभिमानाचे कार्य आहे.आणि आत्ताची पिढी जी अनेक प्रलोभनांमध्ये अडकलेली आहे,त्यातील काही युवक आजही श्रद्धेने व निष्ठेने महाराजांच्या स्मरणार्थ “धर्मवीर मास” पाळत आहेत त्यांचा आम्हा तळेगावकरांना सार्थ अभिमान आहे. या पिढीने आपल्या राजांचा शौर्य इतिहास आणि संस्कार दुसऱ्या पिढीमध्ये असेच उत्तोत्तम रुजवावे आणि स्वराज्य रक्षण करावे, हीच खऱ्या अर्थाने आपल्या दोन्ही छत्रपती राजांसाठी आदरांजली आहे ..”जय शिवराय” “जय शंभुराजे”..
पूनम निकम – तळेगाव दाभाडे..

संपादक : पूनम निकम





