मावळात वनव्यांचा भडका; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, पशुपालक चिंतेत
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगर रांगांमध्ये सध्या बनवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या आगीमुळे डोंगरावरील नैसर्गिक गवत आणि कुरणे जळून खाक होत असल्याने गुरांच्या साऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. परिणामी, दुग्ध व्यवसाय धोक्यात आला असून पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वनव्यामुळे निसर्गाच्या आणि चाऱ्याची हानी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीस वनवे लागतात. मात्र,यंदा हे प्रमाण जानेवारी महिन्यापासूनच वाढल्याचे दिसून येत आहे. डोंगर पायथ्याशी असलेली गायराने आणि डोंगर उतारावरील वाळलेले गवत वनव्याच्या भक्षस्थानी पडत आहे. यामुळे गाई,म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांच्या चराईसाठी उपलब्ध असलेला नैसर्गिक चारा संपुष्टात आला आहे.
पशु पालकांसमोरील आव्हाने:
१) महागडा चारा : नैसर्गिक चारा नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना आता बाहेरून चारा विकत घ्यावा लागत आहे,ज्याचे दर गगनाला भिडले आहेत .
२) दुग्ध उत्पादनात घट: चाऱ्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दुग्ध उत्पादनात मोठी घट होत आहे.
३) वनव्याचे स्वरूप: 99% बनवे हे मानवनिर्मित असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.काही वेळा नवीन गवती येईल या आशेने लावली जाणारी वाऱ्यामुळे रौद्ररूप धारण करते,ज्यामुळे जैवविविधतेचे ही प्रचंड नुकसान होत आहे.
वन विभागाचे भूमिका आणि आवाहन:
पुणे जिल्ह्यातील मावळ,मुळशी आणि जुन्नर सारख्या वनसंपदा असलेल्या तालुक्यांमध्ये वनवे रोखण्यासाठी वन विभागाने गस्त वाढवली आहे. “वनवा लावणे हा गुन्हा असून त्यामुळे केवळ चाऱ्याचेच नव्हे तर दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांचे नुकसान होते”,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची मागणी:
जळालेल्या चाऱ्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने मावळ तालुक्यातील बाधित क्षेत्राचा पंचनामा करून पशुपालकांना अनुदानित दरात चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे

संपादक : पूनम निकम





