तळेगाव येथे पत्रकार दिन उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे: बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन हा साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळेगाव मध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता आजही समाज आणि देशाच्या जनजागृतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापेकर यांनी केले. तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंबर या साप्ताहिकाचे संपादक सुरेश साखवळकर उपस्थित होते. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्याधिकारी दापकेकर म्हणाले की शासन व समाजातील चांगल्या तसेच चुकीच्या बाबी निर्भयपणे मांडल्यास योग्य विकासाला चालना मिळते व चुकीच्या गोष्टींना आळा बसतो. यासाठी तळेगाव शहराच्या विकासात पत्रकारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनीही पत्रकारितेच्या निपक्ष व निर्भीड भूमिकेचे महत्त्व सांगत पत्रकारांना पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत अतुल पवार यांनी केले तर प्रास्ताविक सोनबा गोपाळे यांनी केले. राजेश बारणे यांनी सूत्रसंचालन केले तर मनोहर दाभाडे यांनी उपस्थित आमचे आभार मानले.

संपादक : पूनम निकम





