उद्योगक्राईमताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशहरशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

वाढती लोकसंख्या आणि प्रलंबित पाणी प्रश्न!


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या नजीक वेगाने विकसित होणारे औद्योगिक आणि निवासी केंद्र म्हणून तळेगाव दाभाडे ओळखले जाते.मात्र,गेल्या काही वर्षात या शहराचा झालेला अनियंत्रित विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे येथील पाण्याचा प्रश्न हा नागरिकांसाठी एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गंभीर विषय बनला आहे.

मुंबई पुणे द्रुतगती  मार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे तळेगावात नवीन गृहप्रकल्प, एमआयडीसी, आयटी पार्क यामुळे परप्रांतीय व स्थानिक रहिवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे.ज्यामुळे पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण हा वाढलेला दिसत आहे. त्यातच जुन्या आणि अपुऱ्या पाईपलाईन मुळे शहराच्या सर्व भागात समान पाणी पोहोचवणे नगरपरिषदेसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तळेगावातील बहुतांशी भागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना ह्या मूलभूत गोष्टीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे अनेक गृहनिर्माण संस्थांना खाजगी पाणी टँकरवर मोठा आर्थिक खर्च करावा लागतो.अलीकडेच नवीन पाणीपुरवठा योजनांच्या चाचणी दरम्यान पाईपलाईन फुटण्याच्या आणि गळतीच्या होणाऱ्या घटना समोर आले आहेत ज्यामुळे विकास कामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासाठी प्रशासनाचा कामांचा निकृष्ट दर्जा आणि नियोजनाचा अभाव हेच सर्वतोपरी कारणीभूत ठरत आहे.

प्रशासनाने संपूर्ण दुरुस्तीच्या कामांच्या गुणवत्तेवर कठोर देखरे ठेवणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांची सखोल तपासणी करून दोषी कन्ट्रकदारांवर कायदेशीर व आर्थिक दंडात्मक कारवाई करणे सद्यपरिस्थितीला अत्यंत गरजेचे झालेले आहे. संपूर्ण शहरासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून प्रत्येक भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होईल याची खात्री करावी आणि समान व नियमित पाणी वाटप संपूर्ण शहरासाठी करून नागरिकांची ही मूलभूत समस्या लवकरात लवकर कशी समाप्त करता येईल यावर काम करावे. विविध भागात नवीन पाईपलाईन टाकताना होणाऱ्या तांत्रिक चाचण्या आणि त्यामुळे होणारे रस्ते व वाहिन्यांचे नुकसान यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अनेक भागात नॉन-रेव्हेन्यू वॉटर चे प्रमाण जास्त असणे हे देखील समस्येचे मुख्य कारण आहे.

हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपायोजना प्रशासनाने करणे अत्यावश्यक झाले आहे.यामध्ये सर्वप्रथम विकास आराखड्याशी सुसंगत असा स्वतंत्र व मजबूत वॉटर ग्रीड तयार करणे,जेणेकरून भविष्यात शहराच्या कोणत्याही भागात पाण्याचा तुटवडा भासणार नाही.

अनधिकृत नळ कनेक्शन व गळती बंद करून शहरात होणारी पाण्याची चोरी आणि भूमिगत पाईपलाईनची होणारी गळती शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.( उदा. SCDA किंवा GIS यंत्रणा )

शहरातील पाण्याचे जुने स्त्रोत उदाहरणार्थ.तळी विहिरी आणि जलस्त्रोत पुनरुज्जीवीत करणे आणि नवीन इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) सक्तीचे व प्रभावीपणे कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

तळेगाव हे पुणे मुंबई-महामार्ग आणि लोहमार्गावर असल्यामुळे येथे औद्योगिक व निवासी स्थलांतर वेगाने झाले आहे.विकास आराखड्यानुसार शहराची लोकसंख्या आणि भौगोलिक सीमा जसजशा विस्तारत आहे त्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होणे ही शहराची गरज झालेली आहे.परंतु लोकसंख्या वाढीच्या वेगापेक्षा पाणीपुरवठा यंत्रणेचा विस्तार मंद गतीने झाल्याने हा ताण वाढला आहे. यामुळे प्रशासनाने केवळ नवीन घोषणा करण्याऐवजी तळेगावकरांना शाश्वत, स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यासाठी दीर्घकालीन व शिस्तबद्ध धोरण राबवणे काळाची गरज आहे.

पूनम निकम (डिजिटल वार्ता )

 

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *