मावळच्या भूमीचा वाढला मान! तळपेवाडी चे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान!
मावळ,दि.१५: मावळ तालुक्यातील वडेश्वर येथील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेतलेल्या आणि तळपेवाडी गावचे सुपुत्र तथा पोलीस उपनिरीक्षक शरद गिरजू लोहकरे यांना त्यांच्या पोलीस खात्यातील दीर्घकालीन,निष्ठावान व निष्कलंक सेवेसाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले आहे.भारत सरकारच्या गृह मंत्रालय तसेच पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
पोलीस सेवेत कार्यरत असताना लोहकरे यांनी नेहमीच कर्तव्यनिष्ठा,शिस्त आणि प्रामाणिकपणाला प्राधान्य दिले आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बजावलेली उल्लेखनीय सेवा अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन हा बहुमान त्यांना देण्यात आला आहे.
हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून त्यांच्या अनेक वर्षांच्या निस्वार्थ सेवेची शासकीय पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या यशाने तळपेवाडी गावासह संपूर्ण मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानचा तुरा रोवला गेला आहे.ह्या गौरवामुळे ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस दलात प्रामाणिकपणे देशसेवा करण्याची प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या ह्या उल्लेखनीय यशाबद्दल तळपेवाडी ग्रामस्थ, नातेवाईक,मित्रपरिवार व मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादक : पूनम निकम





