मनोरंजनमहाराष्ट्रशिक्षण-प्रशिक्षणसामाजिक

मराठी भाषा गौरव दिन!


“हीच माय मराठी आहे,ही भाषा नाही फक्त शब्दांची, ही अस्मितेची ओळख आहे,जगाच्या पाठीवर उभी ठाकलेली माझ्या महाराष्ट्राची शान आहे”.

आज मराठी भाषा गौरव दिन, दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो.  मराठी साहित्यातील योगदानाबद्दल व त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्याचा निर्णय २०१३ मध्ये महाराष्ट्र शासनाने घेतला.आपल्या सर्व साहित्यिक कवी व लेखकांचा सन्मान करण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि संमेलनांचे आयोजन राज्यभरात केले जाते.या सर्वांमुळे आपल्या मराठी भाषेचा वारसा समृद्ध झाला आहे.

कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक कवी, नाटककार व कादंबरीकार होते. त्यांच्या “विशाखा” ह्या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कुसुमाग्रजांचे लेखन म्हणजे मराठी भाषेचे संवर्धन, विकास व समृद्धीला प्रोत्साहन देण्याचे तंत्र आहे. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक तेजस्वी, बहुआयामी आणि युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साहित्य लेखनामुळे मराठी भाषेला एक वेगळी उंची व अभिजात दर्जा प्राप्त झाला. त्यांनी विविध प्रकारचे साहित्य लेखन केले. त्यांच्या कवितांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव ,मानवी मूल्ये आणि स्वातंत्र्याची आस स्पष्टपणे दिसते. त्यांनी नाटकाच्या क्षेत्रातही मोठे योगदान दिले त्यांचे “नटसम्राट” हे नाटक विशेष गाजले.या नाटकांमध्ये त्यांनी एका महान रंगभूमी कलाकाराचे जीवन,त्याच्या जीवनात आलेले संघर्ष आणि त्याची शोकांतिका अत्यंत समर्पक आणि प्रभावशाली पद्धतीने मांडली आहे. या नाटकावर आधारित चित्रपट देखील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला.

कुसुमाग्रजांच्या साहित्यामध्ये समाजातील अन्याय, विषमता, दुःख याविषयीची संवेदनशीलता आढळून येते. त्यांनी दलित, पीडित आणि वंचित घटकांच्या वेदना आपल्या लेखणीतून सदैव मांडल्या. त्यांच्या लेखनात सामाजिक संदेश व देशाविषयी स्वाभिमानाची जाणीव आहे. कुसुमाग्रजांना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना १९८७ साली “ज्ञानपीठ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जो भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो.तसेच त्यांना “पद्मभूषण” हा मानाचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

कुसुमाग्रजांच्या कविता नेहमी सर्वांना प्रेरणा देतात. कवी हा आपल्या सर्जनशीलतेने शब्दांना विविध रंग देऊन अर्थ देऊन परिपूर्ण करतो. असे म्हणतात “जे न देखे रवी ते देखे कवी” कवी केवळ लेखक नाही तर,तो ज्ञानी व हुशार असतो. मराठी साहित्यात भावगीत,अभंग, ओवी, पोवाडा, लावणी निसर्ग कविता,बालकविता, गझल, मुक्त छंद असे विविध कविता प्रकार लोकप्रिय आहेत. कविता ह्या प्रामुख्याने भावभावना, निसर्ग, भक्ती, विररस व सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या असतात. कुसुमाग्रजांच्या अनेक कविता आजही अजरामर आहेत. त्यापैकी माझी आवडती कविता म्हणजे “कणा”. ही कविता जेव्हा मी शाळेत शिकले, तेव्हा  निर्भीडपणे आलेल्या संकटाला कोणाचीही मदत न घेता सामोरे कसे जायचे ह्याची शिकवण मनावर करून गेली. ह्या कवितेतील शेवटच्या चार ओळी आजही माझ्या स्मरणात आहेत. ” खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी,मोडला नाही कणा,पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा”. ह्या चार ओळी आजही मला जेव्हा कधी हरल्यासारखं वाटतं तेव्हा, सक्षमपणे उभ राहण्यासाठी धीर व प्रेरणा देतात. कितीही संकट आयुष्यात आली तरी कधीही लढणं थांबवायचं नाही, सतत कष्ट करायचे जोवर आपल्या मनगटात ताकद आहे तोवर. लढण्याची जिद्द ही  नेहमी तुमचा यशाचा मार्ग सुकर करत असते. हे मी लहान असतानाच ह्या कवितेमुळे शिकले.

अशा या आपल्या थोर साहित्यिक कुसुमाग्रजांना मराठी दिनानिमित्त माझा मानाचा मुजरा. कुसुमाग्रज हे मराठी साहित्य विश्वातील अजरामर व्यक्तिमत्व आहे. आजही त्यांचे सर्व साहित्य समाजाला प्रेरित करतात. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य एक तो मराठी” कुसुमाग्रजांचे हे प्रेरणादायी साहित्य सदैव पुढील पिढीस मार्गदर्शक राहील.

 


डिजिटल वार्ता

संपादक : पूनम निकम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *