डिअर बिबट्या…
डिअर बिबट्या….. कसा आहेस? सर्व ठीक आहे ना? माध्यमातून असं कळाले की तू नागपूरला आला होतास? काय झालं? एकदम नागपूरवारी तेही भर अधिवेशनामध्येच.बहुतेक सर्व बिबट्याचा प्रतिनिधी म्हणून अधिवेशनामध्ये तुझे मत व्यक्त करायला येणार होता का? जाण्याचा रस्त्यात लावलेल्या barrigate मुळे तुला तिथपर्यंत पोहचता आले नसेल कदाचित असो. आता काय मजा आहे तुमची बकऱ्या मिळणार असं समजलं भारीच..
बरं, आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधी नी तुझ्यावर थंडीत विधानसभा गाजवली म्हणे आज तू सतत्तेच्या व लोकांच्या केंद्रस्थानी आला बाबा एवढी प्रसिद्धी तर नेता व नटालाही भेटत नाही. जंगल झाडी सोडून गावात का शिरतोय? तिथे गावाचे बोर्ड लावलेले असताना जातो. बरं, गावं झालं तर झालं आता शहरात सुद्धा शिरायला लागलास..कसं होईल अशाने मित्रा तुझे? तू चुकलास मित्रा पण आम्ही म्हणजे माणूस म्हणून आम्ही कधी चुकलो नाहीच असं आम्हाला व आमच्या लोकं प्रतिनिधीना वाटत नाही. आम्ही अघोरी विकासाच्या ओघात जंगलाचे वन केले..
जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे आम्ही शिरलो, कधी खदानसाठी, कॅनलसाठी, हायवेसाठी, शहरीकरण्यासाठी अतिक्रमाणावर अतिक्रमण करत गेलो. कुरण, झुडपी असलेली जंगल नष्ट केली आणि शेवटी दोष सुद्धा तुलाच देऊ लागलो.
तुला बोलता आलं असते तर किती बरं झालं असतं, तुमचे मत पडले असते तर किती बरं झालं असतं. तुमचा सुद्धा आमदार, खासदार असता तर किती बरं झालं असतं. तुमच्यावर होतं असलेल्या अन्यायाची जाणीव तर झाली असती. तुमचा अधिवास हिरावून घेताना त्यांनी विचार तर केला असता. जसं आम्हाला ताण तणाव येतो तसा तुम्हाला येतो याची जाणीव तर झाली असती. परिस्थितीमुळे पोटाची भूक मिटवण्यासाठी मानस जशी भीक मागतात, गुन्हेगार होतात किंवा इतर मार्गाला लागतात तसेच तुझ हक्काचे रान मोकळे केल्यावर तू सुद्धा तुझ्या नैसर्गिक स्वभावानुसार वागणार. जंगलात नाहीतर शेतात शिरणार, गावात शिरणार, शहरात शिरणार आणि अनुचित घटना घडली की आणि यावर उपाय काय तर पकडा, पिंजऱ्यात टाका, कोणी माणूस म्हणतो गोली घाला,हाईट तर पुढे काय तर तुला पाळीव करा. यापुढे अजून आहे परदेशवारी करण्यासाठी तुला थेट आफ्रिकेत पाठवणार म्हणे. मजा आहे बाबा दोस्ता तुझी. काय डोंगर, काय झाडी, काय बकरी, काय अफ्रिका…
बरं, तुझ्यावतीने आता थोडं मी बोलतो, कोणी म्हणतं तू निसर्ग चक्रातील महत्वाचा घटक आहेस कोणी म्हणतं तू नुकसानदायक आहेस. कोणी तुझ्या हक्कासाठी लढतंय तर कोणी तुला मर्यादित ठेवण्यासाठी बोलतंय, म्हणजे प्रत्यक्ष मारून किंवा इतर मार्गाने बंदी करून. पण मी म्हणतो भारतीय संविधानानुसार जसा आम्हाला जगण्याचा अधिकार आहे तसा तुलाही तो निसर्गाने व संविधानाने दिला आहे हे का कळतं नाही?
तुझ्यामुळे होणाऱ्या घटनेवर ते बोलतात मग रस्त्यावर होणाऱ्या अपघात विषयी का बोलत नाही? मच्छर चावून माणसांचा जीव जातो त्यावर चर्चा करत नाही. अस्वच्छतेमुळे लोकं दगवतात त्यावर कुणी शब्द काढत नाही असं का? हा सुद्धा संघर्ष आहेच कि.. पण यावर कुणी बोलणार नाही कारण तो आमचा दोष आहे आणि त्यावर कसं बोलणार? मग सॉफ्ट टार्गेट तू आहेस तुझ्याकडून आगळीक झाली कि ते तुझ्यावर बोलणार कारण तू अबोल आहेस मित्रा.. तुझी चूक धरणार पण घटना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी याविषयी कुणी बोलत नाही, तुझ्या निसर्गातील सवयी लोकांना मोठया प्रमाणात समजून सांगाव्यात त्याविषयी कुणी जास्त विषय काढत नाही, काढला तर मर्यादित, थोडं तुला समजून घेणार नाहीत. असो, काळजी घे, जमलं तर येतो परत, संधी भेटली कि परत भेटू आपल्या गावातील लोकांमध्ये.. तू, मी, जंगल आणि आपले लोकं.
तुझाच….
लेखक :प्रफुल्ल सावरकर
संपादन :पूनम निकम

संपादक : पूनम निकम





